स्वतःला समजून घेण्याची आणि स्वतःची काळजी घेण्याची क्षमता आपण हळूहळू वाढवू शकतो. काही वेळा स्वतःकडे लक्ष देणं उपयोगी पडतं, तर काही वेळा counsellor किंवा psychologist चं मार्गदर्शन आवश्यक असू शकतं. गरजेनुसार psychiatrist कडून मूल्यांकन आणि औषधोपचारांची मदतही लागू शकते. हे ठराविक क्रमाने येणारे टप्पे नाहीत; मदतीचं स्वरूप व्यक्तीच्या गरजेनुसार ठरतं. मग मानसिक आणि भावनिक स्वास्थ्याकडे वेळेत लक्ष देणं जास्त योग्य नाही का ठरणार?
पण मग स्वतः लक्ष द्यायचे म्हणजे काय करायचे? तर सगळ्यात आधी जेव्हा ही शंकेची पाल चुकचुकते तेव्हा स्वतःला सावध करून आपल्याबरोबर काही तरी नेहमीपेक्षा वेगळे घडते आहे, खूप काळ असेच टिकून राहते आहे त्याकडे लक्ष देणे. कुठल्यातरी विशिष्ट घटनेतून बाहेर पडायला आपण नेहमीपेक्षा जास्त वेळ घेतो आहोत आणि हे काहीतरी वेगळे आहे याकडे डोळसपणे पाहणे. मग हे वेगळे म्हणजे नक्की काय? तर निश्चितच ती वेगळी reaction असेल किंवा वेगळं feeling असेल.
त्यावेळी जाणवणारी भावना ओळखणं आणि समजून घेणं महत्त्वाचं असतं. राग, मत्सर किंवा ईर्षा यांसारख्या कठीण भावना येणं म्हणजे मानसिक स्वास्थ्य बिघडलंच असं नाही. पण अशी भावना मला येऊच कशी शकते या विचाराने आपण अधिक disturb होऊ शकतो. एक माणूस म्हणून मी सुखद आणि अस्वस्थ करणाऱ्या दोन्ही प्रकारच्या भावना अनुभवू शकतो असा दृष्टिकोन ठेवला तर त्या भावनेचा स्वीकार करता येईल. एकदा ती भावना आपली म्हटली की तिच्याशी कसं वागायचं यावर स्वतः काम करण्याची आणि गरज असेल तर मदत घेण्याची तयारी होऊ शकते.
हे सगळं करण्यामागे स्वतःला आणि इतरांना समजून घेणं, स्वतःची काळजी घेणं आणि भावनांना योग्य पद्धतीने व्यक्त करता येणं हा हेतू असावा.
