तर एका प्रोजेक्टसाठी पुढची १८ वर्षे विनातक्रार स्वतःला तयार करणे. आपल्या आयुष्यात आलेला हा नवा जीव सर्वस्वी आपल्यावर अवलंबून आहे. त्याला तो स्वतंत्रपणे स्वतःच्या पायावर उभा राहेपर्यंत वाढवणे, जपणे. पालक म्हणून जसे आपण त्याला हे सगळे देत असतो त्यावेळी तो देखील आपल्याला, आपल्यावर संपूर्ण विश्वास ठेवून निरागस प्रेम, आनंद, उल्हास देत असतो.
पालक आणि मुलांमधली ही देवाण-घेवाण काही काळ खूप निरपेक्ष चालू असते. पण हळूहळू मूल मोठं होऊ लागलं की ही गणितं बदलताना आपण पाहतो. ते बदल समजून घेण्याआधी आपण स्वतःला पालक म्हणून किती ओळखतो हे जाणून घ्यायला हवे.
एक पालक म्हणून मी कसा आहे, कशी आहे आणि एकत्रपणे आई-वडील म्हणून आपण कसे आहोत हे समजून घ्यायला हवे. अनेकदा मुलांच्या बाबतीत निर्णय घेताना पालकांचेच एकमत नसल्याचे आढळून येते आणि इथे मुलांचा खूप गोंधळ वाढतो. तुमचे पालकत्व मुलांपर्यंत कसे पोचते आहे यावरून मुलं प्रतिसाद देत असतात, घडत असतात. पालक म्हणून आपण खूप कठोर आहोत की अतिसौम्य आहोत, आपण सतत त्यांच्या मागे लागतो की अजिबातच त्यांच्याकडे लक्ष देत नाही. हे आपल्याला माहीत असायला हवे.
आपण मुलांना कसं वाढवतो याचा त्यांच्या विकासावर महत्त्वाचा परिणाम होतो; त्याबरोबर त्यांचा स्वभाव, अनुभव आणि आजूबाजूचं वातावरणही भूमिका बजावतात. त्यांचा सर्वांगीण विकास होण्यासाठी आपले प्रयत्न योग्य आहेत की नाही हे वेळोवेळी पडताळून पाहायला हवं. आपलं मूल confident आहे का, इतरांशी कसं वागतं, स्वतःच्या भावना मोकळेपणाने व्यक्त करू शकतं का, friendly आणि cooperative आहे का? ते मनातल्या गोष्टी आपल्याशी विश्वासाने बोलतं की भीतीपोटी? हे सगळं आपण पालक म्हणून कसं घेतो, याचाही विचार व्हायला हवा.
मुलांना वाढवत असताना आपणही या गोष्टी शिकत, समजून घेत वाढत नसतो का?
