मुलं वयात येतात हेच कायम ऐकत आलो आहोत पण, पालक वयात येणं कशाला म्हणायचं? खरंय, आपली मुलं वयात येतात तेव्हा त्यांच्या वागण्यात, बोलण्यात, दिसण्यात घडणारे बदल हे सगळं त्यांच्या बरोबर घडतं, ते वयात येतात… पालक नाही…! असं असेल तर मग मुलं वयात येतानाचा काळ पालकांसाठी का तणावाचा होतो?
कालपर्यंत लहान वाटणारं आपलं मूल अचानक काही कळायच्या आत इतकं बदलायला का लागलं? आपलं आता काहीच ऐकत नाही, आपल्याबरोबर कुठे येत नाही, सतत स्वतःमध्ये नाहीतर मित्र-मैत्रिणी आणि मोबाईलमध्ये रमतं… अस्वस्थ करतं ना हे सगळं? म्हणूनच मुलांबरोबर पालकांचाही पालक म्हणून, मुलांचे मित्र म्हणून घडण्याचा हा काळ. यात मुलांना समजून घेण्यासाठी आपण करत असलेली धडपड, त्यांच्याबद्दल वाटणारी काळजी, हे सगळं कसं पोचवायचं त्यांच्यापर्यंत? एकीकडे आपली मुलांशी मैत्री करण्याची धडपड आणि दुसरीकडे मुलांचं आपल्याला शत्रू असल्यासारखं पाहणं का असतो हा विरोधाभास? ही gap सगळे पालक आणि मुलं या phase मध्ये अनुभवत असतात.
पालक म्हणून तुम्हाला पडणारे हे प्रश्न खरंच समजून घेण्यासारखे आहेत. पालकांना या काळात काय वाटतं आणि काय वाटायला हवं याचा झगडा त्यांच्याही मनात चालू नसतो का? या सगळ्या प्रश्नांसाठी, मुलांशी योग्य संवाद साधण्यासाठी आणि खऱ्या अर्थाने त्यांच्याशी मैत्रीचे नाते जुळवण्यासाठी, सगळ्यात आधी त्यांच्याप्रमाणे हा काळ आपल्याही आयुष्यात पालक म्हणून वयात येण्याचा काळ आहे हे मान्य करायला हवं. पालक म्हणून स्वतःलाही समजून घेण्याचा प्रयत्न करायला हवा. ज्यामुळे मुलांना समजून घेण्यामागची आणि समजावण्यामागची आपली भूमिका स्पष्ट व्हायला मदत होते. मुलांमधील या वयातील हे सगळे बदल खूप नैसर्गिक असतात पण आपल्याला पालक म्हणून काही गोष्टी समजून घ्याव्या लागतात, शिकाव्या लागतात.
काय हरकत आहे मग पालक म्हणून वयात येतानाचा अनुभव घेऊन बघायला आणि मुलांचं वयात येणं म्हणजे काय हे समजून घ्यायला?
