मूल त्याच्या वाढीच्या वयात असताना स्वतःच खूप भावनिक, मानसिक आणि शारीरिक बदलांना सामोरं जात असतं. या बदलांना घेऊन ते उत्सुक असतं, गोंधळलेलं असतं, काही वेळा खूष असतं, कधी कधी तणावात असतं. आपल्यात अचानक हे बदल कुठून आले? का आले? हे फक्त माझ्याबरोबरच होतंय की सगळ्यांना होतं असं? कुणाला आणि कसं विचारू हे सगळं? गोंधळ, भीती, कुतूहल, उत्सुकता या सगळ्या भावना ते एकदम अनुभवत असतं.
तर दुसरीकडे पालक त्याच्याकडे त्याला काही तरी आजार झाल्यासारखं पाहत असतात. त्यांना त्याची काळजी वाटायला लागते कारण त्यांनाही मुलांमधील बदल त्याच्या hormonal changes मुळे होताहेत, हे खूप स्वाभाविक आहे, हे समजत नसतं. या काळजीपोटी पालक मुलांना सल्ले देणं सुरू करतात, वेळप्रसंगी त्यांच्यावर कठोर बंधन घालून त्यांना कंट्रोल करण्याचे प्रयत्न करू लागतात.
मुलांमध्ये हे बदल होणारच आहेत, हे खूप नैसर्गिक आहे. मग हा टप्पा नक्की काय आहे? का मुलं पहिल्यासारखी वागत नाहीत, का त्यांना एकटं राहायचं असतं, आई-वडिलांबरोबर वेळ न घालवता ते मित्र-मैत्रिणींमध्ये इतके का रमतात? त्यांच्याबद्दल पडणारे हे प्रश्न कसे सोडवायचे? काय आहे हे कुमारवय (Adolescence). मुलांच्या या बदलाच्या, घडण्याच्या, स्वतंत्र होण्याच्या process कडे पालक म्हणून मी कसे पाहायला हवे? त्याला पडणाऱ्या प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी मी स्वतःला कसे तयार करायला हवे?
अनेकदा असे दिसून येते की मुलांच्या प्रश्नांची उत्तरं आपल्याकडे नसतात आणि ती देता येत नाहीत तेव्हा आपण त्यांच्यावर जास्त चिडतो. पण मग थोडा अभ्यास करून आणि मार्गदर्शन घेऊन आपण ही माहिती आधीच मिळवली तर हा काळ त्यांच्याशी लढण्यात न जाता त्यांच्याशी मैत्री फुलवण्यात घालवता नाही का येणार?
