Gayatri VaidyaClinical Psychologist
← Understanding Emotions

Understanding Emotions · मराठी

दुःखाने ठरवलेलं वास्तव

rain-speckled window with a blurred bright garden beyond, quiet and reflective, no despair clichés.
AI-created editorial image

दुःखात असणाऱ्या व्यक्तीचा सगळ्यात त्रासदायक (गैर)समज म्हणजे, मी एकटाच दुःखी आहे आणि बाकी सगळे मजेत आहेत, त्यांचं सगळं छान चालू आहे. कुठल्याही भावना जेव्हा आपल्यावर हावी होतात तेव्हा त्या तुमची तर्क लावण्याची क्षमता आधी कमकुवत करतात. याचीच दुसरी बाजू अशीही आहे कि त्या, आपला हा (नकारात्मक) विचार कसा खरा आहे याबद्दलचे पुरावे गोळा करून देऊन तेही खरं मानायला लावतात. नकारात्मक भावनांचं सामर्थ्यच असतं की त्या आपल्याला अशा ठिकाणी नेऊन ठेवतात जिथून काहीच चांगलं नाही वाटलं पाहिजे. कालपर्यंत आवडणाऱ्या गोष्टी न आवडायला लागतात. कामाची गती मंदावते. इतरांच्या आनंदाशी connect च नाही करता येत.

मजेची गोष्ट अशी आहे की या काळात आपला सगळ्यांवरचा विश्वास उडालेला असतो किंवा कुणाचं ऐकावंस वाटत नसतं पण आपल्या मनातील प्रत्येक विचारांवर आपण आंधळेपणाने विश्वास ठेवत राहतो. म्हणजे आधी सांगितलं तसं. आत्ता माझ्या मनात आलेला विचार हा माझ्या दुःखी भावनेला पूरक आहे म्हणजे तो खराच आहे असं आपण मानायला लागतो. ‘याची दुसरी काही बाजू असू शकेल’ असे विचार आपल्या मनातही येत नाहीत. आपली तर्क लावण्याची क्षमता कमकुवत झाली असली तरी या नकारात्मक विचारांच्या बाबतीत मात्र तिने जोर धरलेला असतो. माझा विचार कसा खरा आहे हे पटवून देण्याचं सामर्थ्य अशावेळी त्या व्यक्तीच्या बोलण्या-वागण्यातून ठळकपणे दिसून यायला लागतं.

अशा व्यक्तीशी संवाद साधताना त्याच्या आजूबाजूचे लोक जेव्हा त्याच्याशी तार्किक संवाद साधून समजावण्याचा प्रयत्न करतात तेव्हा ती व्यक्ती अजून जास्त विचारांच्या गुंत्यात अडकते, आपल्याला कुणी समजून घेणारं नाही ही भावना दृढ व्हायला लागते आणि मदत करणाऱ्याला वाटतं, मी इतकं आटापिटा करून समजावलं तरी याच्या डोक्यात काही प्रकाश पडत नाही, याला माझी किंमत नाही, याला कुणाचंच ऐकायचं नाही. हळूहळू त्यांचेही प्रयत्न थांबायला लागतात.

स्वतःच्या मनातले गोंधळ, आपल्याच माणसांकडून आलेले हे आरोप आणि निराशा, यात ती दुःखी व्यक्ती अजून कोशात जाऊन, अतिविचारांमध्ये गुंतायला लागते. हळूहळू त्या व्यक्तीचं इतरांकडून मदत मागणं थांबू लागतं. मग कधीतरी वाटून गेलेला एकटेपणा खराही ठरायला लागतो. दुःखाबरोबर निराशाही जाणवायला लागते. असं हे त्याचं गुंतागुंतीचं विश्व, ना त्याला पेलता येत ना त्याच्या आजूबाजूच्या लोकांना. पण मग असं असेल तर चांगलं वाटेल कशाने आणि हे दुष्टचक्र थांबवायचं कसं?

तर मानसशास्त्राने यासाठी अनेक उपाय सांगितले आहेत. वेगवेगळ्या therapies च्या साहाय्याने यातून बाहेर पडण्याचे मार्ग उपलब्ध करून दिले आहेत. अनेकदा गोष्ट खूप हाताबाहेर गेली कि आपण त्याकडे वळतो. पण तोपर्यंत त्या व्यक्तीच्या मनातले विचार जास्त घट्ट झालेले असतात. म्हणूनच वेळेत जर यावर काम करता आलं तर बरेचसे damages टाळता येतात. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे Professional help आणि जवळच्या व्यक्तींकडून मिळणारी help यात खूप फरक आहे. “Feeling better” आणि “getting better” यात आहे तितकाच…!

Gayatri Vaidya
Back to top ↑