गोंधळलेली नजर, आवळलेल्या मुठी, चेहऱ्यावर दिसणारी घुसमट. समोर जर अशी व्यक्ती बसली असेल तर…? तर… लक्षात घ्यावं, तिची गोंधळलेली नजर कुणाला तरी शोधते आहे (कदाचित स्वतःलाच!), तिच्या आवळलेल्या मुठीत तिने तिची सगळी स्वप्नं बांधून ठेवली आहेत (जी पूर्ण करण्याची ताकद तिच्या या मुठीतच आजही आहे याचा जणू विसरच पडलाय तिला), घुसमटलेला भाव ओरडून ओरडून सांगतोय की, आता कसं सावरू स्वतःला हे सांगा कुणीतरी नाहीतर, संपून जाईल सगळं…!
माणूस या अवस्थेला आला की खूप हळवा, हतबल, असहाय झालेला असतो. अशावेळी कुणीतरी दुसरा येईल आणि “त्याचा हात धरून मी पुन्हा जगायला सुरूवात करीन” हि भावना टोकाला गेलेली असते. माझं मला सावरता येईल, पुन्हा मी पूर्वीसारखं “normal life” जगणं हे अशक्य असल्यासारखं वाटतं. अनेकांना ती साथ मिळते, काहींना नाही मिळत.
माणूस हा जरी social animal असला तरी, तो private, personal, professional आणि काहीजणं तर secret life (people who value their space and freedom more than anything) जगताना दिसतात. जगण्याच्या या निवडी प्रत्येकाच्या personality नुसार ठरतात. जेव्हा सगळं संपलंय असं वाटतं तेव्हा या आपल्या निवडीनुसार आपण त्यातून बाहेर पडण्याचा मार्ग शोधतो. पण या सगळ्यात एक common factor असतो म्हणजे “आशा” (hope). कारण असं म्हणतात की सगळ्यात शेवटी मरते ती “आशा”. जोपर्यंत hopes आहेत, मग त्या आयुष्यावर असो किंवा अजून कशावर, तोपर्यंत माणूस लढायला सक्षम असतो आणि लढतोही. पण ज्यादिवशी ही “आशा” मरते, त्या दिवशी खरं खरं कस लागतो संघर्षाचा. म्हणूनच जेव्हा सगळं सुटायला लागतं तेव्हा आपली सगळी शक्ती एकवटून ती “आशा” जागी ठेवण्याचा प्रयत्न सगळ्यात आधी करायला हवा.
मला मदतीची गरज आहे हे जाणवणं आणि त्याहीपुढे जाऊन मदत घेणं, हे “आशा” जिवंत असल्याचं सगळ्यात पहिलं लक्षण आहे. जेव्हा सगळं संपलंय असं वाटतं तेव्हा क्षणभर लक्ष देऊन पाहिलं तर जाणीव होईल, काहीतरी अजूनही उरल्याची. आपली निराशा, हतबलता आपल्याला याकडे पाहायला उसंतच मिळू देत नसते. विचारांच्या गर्दीत फक्त अंधार असतो, पण त्यातून बाहेर पडता येऊ शकतं हे दाखवणारा “आशेचा किरण” आपल्याच आत असतो आणि तोही आपल्याच इतका बाहेर येण्यासाठी संघर्ष करत असतो.
आपण संघर्ष करणं का सोडलं? कुठल्या क्षणाला आपण हे स्वीकारलं कि आता नाही लढता येणार आपल्याला? आणि आता असं काय हवंय ज्याच्यासाठी मला लढावं असं वाटू शकेल? या प्रश्नांची उत्तरं नक्कीच मदत करतील त्या एका आशेच्या किरणाच्या सहाय्याने पुन्हा नवी स्वप्नं बघण्यासाठी. नव्याने मिळालेली स्वतःची ओळख जपण्याची आणि पुढे ती जगण्याचीही.
