Gayatri VaidyaClinical Psychologist
← Relationships & Communication

Relationships & Communication · मराठी

Assumption मधून गैरसमजुतींकडे

Two cups of tea beside two empty chairs by a window
AI-created editorial image

Assumption मधून गैरसमजुतींकडे अनेक नाती वळताना आज दिसतात. यामागचं सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे योग्य वेळी, योग्य पद्धतीने आणि योग्य व्यक्तीशी संवाद न होणं किंवा संवाद टाळणं.

आपल्या जवळच्या व्यक्तींकडून कधी नेहमीपेक्षा वेगळी वागणूक मिळाली की आपण काहीतरी assume करू लागतो. “ती माझ्याशी नीट बोलली नाही म्हणजे तिला मी आवडत नाही”, “त्याने मला काही सांगितलं नाही म्हणजे माझ्याकडे दुर्लक्ष केलं” असे अनेक अर्थ आपले आपणच लावतो. पण खरंच आपण जो परिस्थितीचा अंदाज लावतो आहोत, त्यात किती तथ्य आहे हे ठाऊक असतं का आपल्याला?

गैरसमज वाढण्याची अनेक कारणं दिसून येतात. त्यातली सगळ्यात महत्त्वाची कारणं म्हणजे कुणाला व्यक्तच होता येत नाही, तर कुणाला व्यक्त झाल्यावर होणाऱ्या परिणामांची काळजी जास्त असते. आणि सगळ्यात गुळगुळीत कारण म्हणजे “मला तुला दुखवायचं नव्हतं!” पण मग समोरची व्यक्ती कशाने दुखावली जातेय हे खरंच कळतंय का आपल्याला? असं करताना आपण अनेक गोष्टी गृहीत धरतो. खरी परिस्थिती किती समजून घेतली, याचा विचार मात्र होत नाही. खरंच ही कारणं नात्यापेक्षा मोठी असू शकतात का?

सन्मान, संवाद आणि संमेलन या नात्याच्या मूलभूत गरजा आहेत. आपल्या जवळच्या व्यक्तीच्या आयुष्यात काय चालू आहे, ती सध्या कोणत्या परिस्थितीतून जात आहे, कुठे तिला आपली गरज आहे, हे सगळं आपल्याला किती माहीत असतं? मुद्दामून आपण कितीदा पुढाकार घेऊन नाती जपण्याचा प्रयत्न करतो, एकमेकांना वेळ देतो? आपल्याला व्यक्त होता येत नाही, तसंच इतरांना व्यक्त होण्यासाठी आपण safe space आणि तेवढा जिव्हाळा देऊ शकतो का? की हे सगळं हळूहळू आपल्याच आतून संपून गेलंय?

आपल्या नात्यांमध्ये आलेली gap आपल्या लक्षात येते का? की काम, health, distance, privacy, space, freedom या सगळ्यात आपण एकटेच हरवून गेलो आहोत? नात्यातील संवादाचं महत्त्व कमी झालं की ते नातं आपोआपच दूर जाऊ लागतं. पडलेल्या प्रश्नांची उत्तरं मिळवणं ही नात्यातील दोन्ही व्यक्तींची जबाबदारी असते. तसं घडत नसेल, तर आपणही संवाद हरवलेल्या नात्यात फार प्रश्नांमध्ये स्वतःला गुंतवून घेऊ नये. तरीही प्रश्न निर्माण झालेच, तर त्यांना शांतपणे समजून घेऊन, तटस्थपणे त्यांची उत्तरं शोधण्याचा प्रयत्न करावा — आपला आपणच.

Gayatri Vaidya
Back to top ↑